
मेघवाडी पोलिसांची कारवाई; शस्त्रास्त्रांसह १० लाख जप्त, आरोपी अटकेत
मुंबई – मेघवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली असून, त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे आणि १० लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
दि. ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सम्राट वाघ आणि त्यांच्या पथकाला माहिती मिळाली की, आरोपी गौस मोहीद्दीन शहाबुद्दीन सय्यद हा जोगेश्वरी परिसरात अवैध शस्त्र विक्रीसाठी येणार आहे. त्यानंतर पोलिसांनी रामगड, पश्चिम द्रुतगती मार्ग येथे सापळा रचला. रात्री १०:१० च्या सुमारास संशयित व्यक्ती आढळून आली. पोलिसांनी वेळीच कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
१० लाख रुपये रोख, २ गावठी पिस्तुल ६ जिवंत काडतुसे तपासादरम्यान आरोपी गौस सय्यद हा मेघवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक आयुक्त संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सपोनि सम्राट वाघ, पोहवा माने, पोशि बागुल आणि माने यांनी यशस्वीरीत्या ही कारवाई करत आरोपीला जेरबंद केले.