महाराष्ट्र ग्रामीण

लोकांचा आक्षेप आकाच्या आकावर, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या ‘त्या’ कृतीला अर्थ नाही : संजय राऊत

मुंबई :  खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी, वाल्मिक कराडवर लावण्यात आलेला मकोका, कायदा सुव्यवस्था मुद्यांवर भाष्य केलं. ते  मुंबईच्या विकासासाठी प्रधानमंत्री येत असतील तर स्वागत आहे, अदानीच्या विकासासाठी नाही, मुंबईच्या विकासासाठी येत असतील तर,  धारावीचा प्रश्न अजून प्रलंबित आहे असं संजय राऊत म्हणाले.   प्रधानमंत्री मणिपूरमध्ये कधी जाणार आहेत हा देखील प्रश्न आहे, दिल्ली निवडणुका झाल्या की त्यांनी मणिपूरमध्ये जावे.  याशिवाय अजित पवार, अशोक चव्हाण यांना एक न्याय आणि धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय का लावण्यात आला, असा सवाल राऊत यांनी केला.

संजय राऊत काय म्हणाले? 

पतंप्रधान कुणाला भेटणार आहेत, महायुतीच्या आमदारांना भेटणार आहेत, त्यांनीच निवडून आणलंय.  महायुतीच्या बैठकीत आज इ व्ही एम चे मशिन ठेवले पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे. महापुरुषांचे फोटो ठेवण्यापेक्षा ते मशीन ठेवावे, नोटांची बंडलं ठेवली पाहिजेत. मग या विजयाचे शिल्पकार मंचावर येतील, असं संजय राऊत म्हणाले.

धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आले आहे की नाही माहीत नाही, पण अजित पवार, हसन मुश्रीफ असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केले.  अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करतात, अशोक चव्हाणांवर आरोप करतात. ते आज मंचावर असणार आहेत तर मग धनंजय मुंडे यांच्यावर अन्याय का? महायुतीत 40 टक्के लोकं कलंकित आहेत, हे स्वत: नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. धनंजय मुंडे यांना एक न्याय इतरांना एक न्याय असं का? हा प्रश्न समोर आला आहे.

वाल्मिक कराडला मकोका लावणं हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्याच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरणं हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. पंतप्रधान मुंबईत असताना महाराष्ट्राच्या एका भागात मणिपूर प्रमाणं हिंसाचार होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्रिपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. एखाद्या गुन्हेगाराला त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु होत असताना भाजपचे समर्थक म्हणवून घेणारे लोक रस्त्यावर उतरतात, हिंसाचार करतात, परळी बंद ठेवतात, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात हा काय प्रकार आहे.  आम्ही आंदोलन केलं तर परवानगी मिळणार नाही, आमच्या लोकांना तुरुंगात टाकतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

लोकांचा आक्षेप आकाच्या आकाला : संजय राऊत

राष्ट्रवादीनं बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली असल्याबाबत विचारलं असता, जोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत या कृतीला काही अर्थ नाही. लोकांचा आक्षेप आकाच्या आकाला आहे. त्याच्यावर कारवाई करायची हिंमत आहे का? तरच संतोष देशमुख यांच्या तपास निष्पक्षपाती होईल. ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ती व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात आहे, आणि तुम्ही चारित्र्यवान व्यक्तींच्या संदर्भात चर्चा करताय. चारित्र्यवान कुणाला हे आम्हाला वर जाऊन धर्मराजाला विचारावं लागेल चारित्र्याची व्याख्या काय?, आम्हाला परत भगवतगीता शोधावी लागेल, त्यात श्रीकृष्णानं अर्जुनाच्या रथावर स्वार होऊन प्रवचन दिलंय का हा मोठा प्रश्न आहे. चारित्र्यवान कोण याचं उत्तर द्या? असं संजय राऊत म्हणाले?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button