E-Paper

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई; दिल्ली ते मध्यप्रदेश-छत्तीसगडपर्यंत ६० ठिकाणी छापे

महादेव बेटिंग अॅपशी संबंधित एका प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्ली येथील ६० ठिकाणी छापे टाकले. या बेकायदेशीर कारवाईत सहभागी असल्याचा संशय असलेल्या राजकारणी, वरिष्ठ नोकरशहा, पोलिस अधिकारी, महादेव बुकचे प्रमुख अधिकारी आणि इतर खाजगी व्यक्तींच्या घरांवर छापे टाकण्यात आले.

महादेव बुक हे रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर यांनी प्रमोट केलेले एक ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म आहे, हे दोघेही सध्या दुबईमध्ये आहेत. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रवर्तकांनी त्यांचे बेकायदेशीर नेटवर्क सुरळीत चालावे यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण शुल्क म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे दिले होते.

महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांना इंटरपोलने रेड कॉर्नरे नोटीस जारी केल्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये दुबईतून अटक करण्यात आली. ईडीच्या विनंतीवरून ही नोटीस जारी करण्यात आली आहे. सीबीआयने सांगितले की, या प्रकरणाच्या तपासादरम्यान महत्त्वाचे डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

हा गुन्हा आधी आर्थिक गुन्हे शाखेने रायपूरमध्ये दाखल केला होता. पण, नंतर छत्तीसगड सरकारने सखोल चौकशीसाठी हा खटला सीबीआयकडे दिला. सीबीआय आता या प्रकरणात वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि इतर आरोपींच्या भूमिकेची चौकशी सुरु केली आहे.

भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी छापा

आज सकाळी सीबीआयने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या घरांवरही छापे टाकले. महादेव बेटिंग अॅपशी संबंधित एका प्रकरणात हा छापा टाकण्यात आला आहे. भूपेश बघेल आज दिल्लीला रवाना होणार होते, तिथे ते काँग्रेसच्या अखिल भारतीय काँग्रेस समिती  च्या ‘मसुदा समिती’च्या बैठकीला उपस्थित राहणार होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button